संपादक उदयकांत ब्राम्हणे
शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा आणि परिसरातील अनेक वर्षांपासून शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुरा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजप्रवाह (लो व्होल्टेज) आणि सिंगल फेजिंगच्या समस्येवर अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या अतिरिक्त पॉवर रोहित्रासह ११ केव्हीच्या सहा किलोमीटर लिंक लाईनचे लोकार्पण आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या हस्ते नाव्हारे येथील उपकेंद्रात करण्यात आले.
मतदारसंघातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी आमदार कटके यांनी शासन आणि महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून आता तो प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्याने हजारो शेतकरी व नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे उरळगाव, न्हावरा गावठाण, कोळपे वस्ती, निंबाळकर वस्ती तसेच आलेगावपागा परिसरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्रावरून दोन स्वतंत्र कृषी वाहिन्या सुरू करण्यात येणार असून, एक वाहिनी उरळगाव परिसराला तर दुसरी न्हावरा, कोळपे वस्ती, निंबाळकर वस्ती आणि आलेगावपागा परिसराला वीजपुरवठा करणार आहे.
सध्या कार्यरत असलेल्या १० एम.व्ही.ए. पॉवर रोहित्रावरील सुमारे २०० अँपिअरचा अतिरिक्त भार नव्या रोहित्रावर वर्ग होणार असल्याने वीजपुरवठा अधिक स्थिर, अखंडित आणि दर्जेदार होईल. हंगामी कालावधी वगळता शेतकऱ्यांना दिवसा कृषी वीज उपलब्ध करून देणे शक्य होणार असून, सिंगल फेजिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. याचा थेट लाभ घरगुती ग्राहकांनाही होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे शेती आणि दैनंदिन जीवनातील वीज अडचणी दूर होणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
“शिरूर-हवेली मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार, अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, ही आमची कटिबद्ध भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागातील वीजप्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. मतदारसंघातील उर्वरित भागांतील वीज यंत्रणाही अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील,” – आमदार ज्ञानेश्वर (माऊली ) कटके.
