कॉलेजमध्ये शिकतानाच आली बहिणीची जबाबदार
पुणे: आई-वडिलांची मायेची सावली डोक्यावरून हरवली की आयुष्य पोरकं होतं. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. वडिलांना जीवदान देण्यासाठी आईने आपलं लिव्हर दिलं, पण दुर्दैवाने दोघेही वाचले नाहीत. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर वडील गेले आणि आठ दिवसांनी आईनेही अखेरचा श्वास घेतला. आता कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलावर लहान बहिणीची जबाबदारी अचानक येऊन पडली आहे. “आम्ही जगायचं तरी कसं?” असा प्रश्न हे भावंडं आज स्वतःलाच विचारत आहेत.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बापू बाळकृष्ण कोमकर (वय ४८) यांना लिव्हरच्या आजारामुळे दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज असल्याचं सांगितलं. बापू यांचा जीव धोक्यात असल्याचं कळताच त्यांची पत्नी कामिनी बापू कोमकर (वय ४५) यांनी धाडसाने पतीसाठी स्वतःचं लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बापू यांना जीवदान मिळेल, अशी आशा कुटुंबाला होती. मात्र, अवघ्या दोनच दिवसांनी शुक्रवारी बापू यांचं निधन झालं. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, आठ दिवसांनी कामिनी यांचाही मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी आनंदी असणाऱ्या या कुटुंबावर एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला.
कर्जाचा डोंगर आणि डोक्यावर जबाबदारी – या शस्त्रक्रियेसाठी मुलाने आणि मुलीने अनेकांकडून कर्ज काढलं होतं. पण या प्रयत्नानंतरही वडिलांचे प्राण वाचवता आले नाहीत. आई जिवंत आहे म्हणून त्यांनी धीर धरला होता. मात्र, ती सावलीही सरकली आणि हे दोघेही भावंडं पोरके झाले. “ना मामा आहे, ना काका… आता बहिणीचं पालनपोषण कसं करायचं? आमचं आयुष्य कोण उचलणार?” असा हताश सवाल मुलाने माध्यमांसमोर केला.
या प्रकरणी कोमकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “डॉक्टरांनी लिव्हर दात्याला कोणताही धोका नाही असं सांगितलं होतं, तरीही आईचाही मृत्यू झाला. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच हा अनर्थ घडला,” असा दावा नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी सह्याद्री हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
