thenirbhidswarajyatimes

 आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; गावकऱ्यांना मिळाली समृद्ध भविष्याची दिशा

Thenirbhudidswarajyatimes

माजी सरपंच राहुल गव्हाणे यांच्या सहकार्याने ‘ग्रामविकासाचा मंत्र’ शिक्रापूरमध्ये गुंजला

शिक्रापूर (ता. शिरूर) दि.१४ सप्टेंबर – गावकऱ्यांच्या मनात विकासाची नवीन उमेद पेरणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम शिक्रापूरमध्ये संपन्न झाला. माजी सरपंच आणि उद्योजक राहुल गव्हाणे यांच्या दूरदृष्टीने आयोजित ‘ग्रामविकास आणि ग्रामसंवाद’ या विशेष व्याख्यानाने उपस्थितांमध्ये  नवीन ऊर्जेचा संचार केला. या कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना समृद्ध आणि आदर्श गाव घडवण्याचा रोमांचक मार्ग दाखवला.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहभाग हाच विकासाचा गुरुमंत्र’ – पेरे पाटील आई प्रबोधिनी फाउंडेशनच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भास्करराव पेरे पाटील यांनी त्यांच्या ऊर्जावान शैलीत सांगितले, “गावाचा खरा विकास हा सरकारी योजना, ग्रामस्थांच्या एकजुटीत, सहभागात आणि सातत्यपूर्ण प्रयत्नात दडलेला आहे.”

त्यांनी एक उदाहरण देत म्हणाले, “विकास हा एक चालणारा हत्ती आहे. तो इतरांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या वाटेने चालत राहतो. तुम्हीही कोणत्याही नकारात्मक टीकेकडे दुर्लक्ष करून सामूहिक विकासाच्या प्रवासाला सुरुवात करा.”लोकसहभाग, स्थानिक निधी, जबाबदार मतदान, पाण्याचे व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरण हे गाव विकासाचे स्तंभ आहेत, असे त्यांनी सविस्तर पटवून दिले.

राहुलदादा, तुम्ही निवडणूक लढा आणि जिंका! युवा नेत्यावर टिपण्णी करताना पेरे पाटील यांनी म्हणाले, “राहुलदादा, तुम्ही निवडणूक नक्की लढा आणि जिंका. पण हे लक्षात ठेवा, की समाजासाठी जगणे हेच खरे जीवन आहे. भगवान राम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवाभावी काम करा. समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही.” हे शब्द ऐकताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

राहुल गव्हाणे: उद्योजकापासून समाजजीवनातील प्रेरणादायी नेता –  माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर एक समाजप्रेमी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. युवकांना स्वावलंबी बनवणे, व्यसनमुक्तीचे कार्य, शिक्षण आणि पर्यावरणक्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे हा ‘ग्रामसंवाद’ कार्यक्रम यशस्वी झाला आणि तळेगाव ढमढेरे परिसराला विकासाची नवीन दिशा मिळाली.

विद्यार्थ्यांना घडवणारी आई प्रबोधिनी फाऊंडेशन –  आई प्रबोधिनी फाऊंडेशन सामाजिक बांधिलकी जपणारे असून आत्तापर्यंत ग्रामीण भागातील ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देत आर्थिक पाठबळ उभे केले.त्यातील ६ विद्यार्थ्यांनी गट क मधून स्वतःला सिद्ध करत शासकीय नोकरी मळवली असून पर्यावरण संवर्धनासाठी १८ हजार झाडे लावण्याचे काम करण्यात आले असून या सामाजिक उपक्रमांच्या व समाजसेवेचे कार्य शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख (काका) याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम केवळ एक व्याख्यान नव्हते, तर गावांच्या भवितव्यासाठी एक प्रेरणादायी सुरुवात ठरली. गावकऱ्यांमध्ये  एक नवी ऊर्जा, नवी उमेद आणि ‘आपल्या हातातून आपले गाव बदलू’ याची नवी इच्छाशक्ती निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!